शेतकर्यांच्या आत्महत्येचा बदला कसा घेणार ?: शिवसेना
मुंबई दि. 6 (वृत्तसंस्था) : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या हत्येचा बदला केंद्र सरकारने घेतला व त्यामुळे सरकारचा जयजयकार सुरू आहे. मात्र, जवानांप्रमाणे शेतकरी देखील मरत आहे. त्यांच्या आत्महत्यांचा बदला कसा घ्यायचा?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये. जवान जिंकतात तेव्हा विजयाचे जुलूस निघतात, पण मरणार्या शेतकर्यांच्या चिता म्हणजे थंडीतील उबदार शेकोटी नव्हे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारचे कान टोचले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होणार असल्याने सध्या सर्वत्र उद्घाटने, मुहूर्त, घोषणांचा धूमधडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याही सभा, भाषणांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कुंभमेळ्यात जाऊन गंगेत डुबकी मारून म्हणजे पुण्यस्नान करून आले. देशातील वातावरण हवाई हल्ल्याच्या धुंदीने बेहोश झाले आहे. त्यांत देशभक्ती हा विषय असला तरी देश म्हणजे फक्त जमीन नाही तर देशातील जनता. त्यामुळे देशालाही पोट असतं व पोटापाण्याचा विचार करावा लागतो. महाराष्ट्रासह देशातील शेतकर्यांच्या किंकाळ्या कानावर येत आहेत. हवाई हल्ल्यांची बेहोशी ठीक आहे. त्या बेहोशीत शेतकर्यांच्या किंकाळ्या विरून जाऊ नयेत, म्हटले आहे.
शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे सरकार सांगत असते व तशा जाहिराती प्रसिद्ध होतात. मग शेतकरी मरतोय का? सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी शिवसेना आग्रही असून ग्रामीण भागातील शेतकरी कर्जमाफीच्या उंच टांगलेल्या हंडीकडे आशा लावून बसल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.युद्धज्वर आणि निवडणूक ज्वराने डोकी बधिर झाली असून अनेक मूळ प्रश्नांचा विसर पडला आहे. राज्यातील 14 हजार 778 गावे दुष्काळग्रस्त आहेत. मराठवाड्यातील पाण्याची पातळी तळ गाठत आहे. टंचाईग्रस्त भागात चारा छावण्या नक्की सुरू झाल्या आहेत काय? जाहिरातींच्या भडिमारात चारा छावण्या कुठे हरवल्या तर नाहीत ना? याचा शोध सरकारला घ्यावा लागेल. सरकारी यंत्रणा पुढच्या चार दिवसांत निवडणूक कामाला जुंपली जाईल व शेतकर्यांची वेदना पुन्हा बेवारस बनेल. निवडणूक प्रचारात शेतकर्यांंच्या कल्याणाच्या नव्या घोषणा होतील. पण शेतकर्यांच्या मानेभोवती आवळलेला फास तसाच राहील, अशा शब्दात शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.